भाजप महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा- ऍड. प्रकाश बिनेदार

पनवेल (प्रतिनिधी) :रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या ०७ फेब्रुवारी रोजी पार पडणार असून या निवडणुकांमध्ये भाजप महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस, नगरसेवक तसेच मागासवर्गीय समाजाचे नेते अ‍ॅड. प्रकाश बिनेदार यांनी केले आहे.ते पनवेल तालुक्यातील विविध गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचार बैठका व कार्यकर्ता मेळाव्यांमध्ये बोलत होते. यावेळी अ‍ॅड. बिनेदार म्हणाले की, भाजप महायुतीने गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी अनेक विकासाभिमुख योजना राबवल्या आहेत. तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी महायुतीने ठोस काम केले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, मागासवर्गीय समाजासह सर्व घटकांना न्याय देण्याचे काम भाजपने केले असून केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी केल्यास विकासाचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे नेला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावून भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहनही अ‍ॅड. प्रकाश बिनेदार यांनी केले. 


Post a Comment

0 Comments