पनवेल (प्रतिनिधी): जनतेचा विकास करण्यापेक्षा केवळ स्वतःचा स्वार्थ जपण्याचे राजकारण केल्यामुळेच माजी आमदार विवेक पाटील यांना आज तुरुंगात शिक्षा भोगावी लागत आहे, अशी घणाघाती टीका माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केली आहे. भारतीय जनता पार्टीने नेहमीच विकासाला प्राधान्य दिले असून पक्षाच्या नेतृत्वावर जनतेचा गाढा विश्वास आहे. त्यामुळे विकासाचा हा रथ अविरत सुरू ठेवण्यासाठी उरणमधील भाजप-महायुतीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी आढावा बैठकीत केले.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून उरण तालुक्यात महायुतीच्या उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच प्रचाराचा भाग म्हणून चिरनेर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार देवेंद्र पाटील, चिरनेर पंचायत समिती गणाच्या उमेदवार साक्षी पाटील आणि आवरे पंचायत समिती गणाच्या उमेदवार समीधा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वशेणी, पिरकोन, सारडे आणि आवरे या गावांमध्ये बुधवारी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान सारडे गावातील विश्वनाथ माळी यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला, त्यांचे परेश ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. या बैठकीवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, पिरकोनचे माजी सरपंच के. वाय. गावंड, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, तालुका अध्यक्ष मुकेश म्हात्रे यांच्यासह वशेणीचे माजी सरपंच विजय म्हात्रे, रतक्ाकर गावंड, सारड्याचे सरपंच रोशन पाटील, आवऱ्याचे माजी सरपंच भार्गव गावंड आणि महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा राणी म्हात्रे यांच्यासह आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments