पनवेल / प्रतिनिधी : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कळंबोली शहराच्या वतीने मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता नवीन सुधागड हायस्कूल, कळंबोली येथे शालेय साहित्य वाटप, वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण या समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरप्रमुख तुकाराम सरक आणि नगरसेविका सायली सरक यांच्या पुढाकारातून हा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, बॅनर आणि जाहिरातबाजी टाळून सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे आवाहन कार्यकर्ते, समर्थक तसेच विविध सामाजिक संस्थांना केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना कळंबोली शहराचे शहरप्रमुख तुकाराम सरक आणि नगरसेविका सायली सरक यांच्या वतीने कळंबोली येथे वृक्षदिंडी, वृक्षारोपण आणि शालेय साहित्य वाटप या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याची भावना जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ करण्याचा आयोजकांचा मानस आहे.यासोबतच पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षदिंडी काढण्यात येणार असून त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि झपाट्याने कमी होत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता "प्रत्येकाने किमान एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे" हा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, ही भावना समाजात रुजविण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येणार आहे.शिक्षण आणि पर्यावरण या दोन्ही विषयांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरणार आहे. खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.वाढदिवसानिमित्त फुलांचे गुच्छ, हार-तुरे किंवा जाहिरातबाजी करण्यापेक्षा समाजाला प्रत्यक्ष लाभ होईल असे उपक्रम राबवावेत, ही आमदार प्रशांत ठाकूर यांची भूमिका असून त्याच विचारातून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. त्यामुळे वाढदिवसाचे औचित्य साधून समाजसेवा, शिक्षणाला प्रोत्साहन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम कळंबोली परिसरासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.
0 Comments