एका व्यावसायिकाच्या माध्यमातून मालक, कामगार, डीजे ऑपरेटर, टेम्पो चालक यांच्यासह सुमारे पाच ते सहा कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे हा व्यवसाय केवळ मनोरंजन क्षेत्राशी संबंधित नसून अनेक स्थानिक कुटुंबांच्या रोजगाराचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, सध्या उच्च डेसिबल आवाजाचे कारण देत पोलीस प्रशासनाकडून थेट साहित्य जप्त करणे, मोठ्या प्रमाणात दंड आकारणे तसेच गुन्हे दाखल करण्यासारखी कारवाई केली जात असल्याने स्थानिक व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. विशेषतः सण-उत्सवांचा हंगाम हा या व्यावसायिकांसाठी वर्षातील महत्त्वाचा व्यवसायाचा काळ असतो. अशा वेळी होणाऱ्या कारवाईमुळे व्यवसायाचे मोठे नुकसान होत असल्याचे असोसिएशनने निवेदनात नमूद केले आहे. कायदेशीर नियमांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर तातडीने गुन्हे दाखल करणे अथवा साहित्य जप्त करण्याऐवजी प्रशासनाने प्रथम समज, सूचना आणि आवश्यक ते मार्गदर्शन करून सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. आगामी सण-उत्सवांच्या काळात ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करून किमान दोन बेस आणि दोन टॉप साऊंड सिस्टिम वापरण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना विनाकारण त्रास होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात. तसेच स्थानिक भूमिपुत्र व्यावसायिकांच्या रोजगाराशी संबंधित या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि व्यावसायिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली.
0 Comments