हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्यांचे वाटप

पनवेल (प्रतिनिधी) : ‘शिक्षण हेच खरे सामर्थ्य’ या विचाराला केंद्रस्थानी ठेवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भव्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. कर्जत फाटा येथील एन. डी. स्टुडिओ येथे झालेल्या या कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उरण-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाला माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, आयोजक अशोक छाजेड, सौ. संगीता अशोक छाजेड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल मेहुल, प्रांत अधिकारी प्रकाश सकपाळ, तहसीलदार अभय चव्हाण, एन. डी. स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत साजणीकर, मुख्य लेखाधिकारी चित्रलेखा खातू, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, जिल्हा परिषद सदस्या नेहा पारंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, सरपंच रीतू ठोंबरे, सुधीर ठोंबरे, भाजपचे मंडल अध्यक्ष प्रवीण मोरे, अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष संतोष खांडेकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, शैक्षणिक साहित्याअभावी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मविश्वासाने शिक्षणाच्या प्रवाहात पुढे जाता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेसाठी आवश्यक असलेले साहित्य एकाच वेळी उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह या उपक्रमाचे यश अधोरेखित करणारा ठरला.यावेळी बोलताना आमदार महेश बालदी यांनी अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. “विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणारा हा उपक्रम आहे. 
एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार. ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आजचा दिवस विद्यार्थी आणि आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना एन. डी. स्टुडिओ पाहण्याची संधी मिळणे ही त्यांच्यासाठी पर्वणीच आहे,” असे ते म्हणाले.एन. डी. स्टुडिओच्या पुनरुज्जीवनाचा उल्लेख करताना बालदी म्हणाले, “आमचे परममित्र नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनानंतर हा स्टुडिओ ओसाड झाला होता. मात्र, नितीन देसाई यांच्यावर असलेले प्रेम आणि कलाकार म्हणून त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नामदार आशिष शेलार यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलून या स्टुडिओला नवसंजीवनी दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”अशोक छाजेड यांच्या कुटुंबाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख करताना आमदार बालदी म्हणाले, “अशोक छाजेड यांच्या वडिलांपासून आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सामाजिक उपक्रम करणे हे छाजेड कुटुंबाचे एक ध्येय राहिले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबविण्यात आला असून, समाजाबद्दलची आस्था या उपक्रमातून अधोरेखित झाली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये मायक्रो प्लॅनिंग महत्त्वपूर्ण ठरले आहे.”स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित करताना आमदार बालदी यांनी ‘वंदे मातरम्’च्या गायनाचाही उल्लेख केला. “आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाचा मानबिंदू असलेल्या लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’ गायले गेले आहे. ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची आणि ऊर भरून येणारी बाब आहे,” असे त्यांनी सांगितले. देश विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असल्याचे सांगताना त्यांनी या भागातील विविध विकासकामांचाही उल्लेख केला. “अनेक प्रकल्प या भागात येत आहेत. जेएनपीटी चौक महामार्गाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात हा परिसर मुंबईशी थेट जोडला जाणार असून, त्याचा मोठा फायदा विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांना होणार आहे,” असे बालदी म्हणाले.उरण मतदारसंघातील आदिवासी बांधवांच्या घरांच्या प्रश्नावरही आमदार महेश बालदी यांनी ठाम भूमिका व्यक्त केली. “माझ्या उरण मतदारसंघातील एकही आदिवासी बांधव कुड्याच्या घरात राहणार नाही. तो पक्क्या घरात राहील, यासाठी माझे कायम प्रयत्न आहेत आणि हे मी पूर्ण करून दाखवीन,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीची भावना अधोरेखित झाली. शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत साहित्याची मदत देऊन गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करणे आणि त्यांना आत्मविश्वासाने शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिल्यास शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया अधिक गतिमान होऊ शकते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारा हा उपक्रम केवळ शैक्षणिक साहित्य वाटपापुरता मर्यादित न राहता शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला. हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेले आनंदाचे हास्य आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मिळालेली प्रेरणा हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती ठरली.

Post a Comment

0 Comments