पनवेलच्या चारही प्रभाग समित्यांना नवे सभापती

पनवेल ( प्रतिनिधी): पनवेल महानगरपालिकेच्या चारही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. ‘अ’ प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत रविंद्र भगत यांनी योगिता फडके यांचा पराभव करत विजय मिळवला. तर ‘ड’ प्रभाग समितीच्या सभापतीपदावर अजय बहिरा यांनी बाजी मारली. ‘ब’ आणि ‘क’ प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड मात्र बिनविरोध झाली.आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी किशन जावळे होते. यावेळी महापालिका आयुक्त मंगेश चितळे आणि महापालिका सचिव नानासाहेब कामठे उपस्थित होते.प्रभाग समिती ‘अ’च्या सभापतीपदासाठी रविंद्र भगत आणि योगिता फडके यांच्यात निवडणूक झाली. भगत यांना १३ मते, तर फडके यांना ४ मते मिळाली. त्यामुळे भगत यांना विजयी घोषित करण्यात आले.प्रभाग समिती ‘ब’साठी मधू पाटील आणि प्रभाग समिती ‘क’साठी रविंद्र जोशी यांचे प्रत्येकी एकच नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाली.प्रभाग समिती ‘ड’मध्ये अजय बहिरा आणि मनिषा म्हात्रे यांच्यात लढत झाली. बहिरा यांना १९, तर म्हात्रे यांना ३ मते मिळाली. त्यामुळे अजय बहिरा विजयी ठरले.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ तसेच संबंधित निवडणूक नियमांनुसार ही प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी किशन जावळे यांनी चारही प्रभाग समित्यांच्या नवनिर्वाचित सभापतींच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.

Post a Comment

0 Comments