पनवेल | (प्रतिनिधी) :देशभरात गाजत असलेल्या NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या अन्यायाविरोधात पनवेल शहर काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करणाऱ्या या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली.यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल त्यांच्यावर झालेल्या पोलिस कारवाईचाही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना न्याय देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.रायगड जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील आणि पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि NEET प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी रायगड जिल्हा काँग्रेसचे विधी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. के. एस. पाटील, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक जनार्दन पाटील, नगरसेवक लतीफ शेख, नगरसेवक तुषार पाटील, नगरसेवक राम पाटील, नगरसेविका लीला कातकरी, माजी तालुकाध्यक्ष महादेव कटेकर, डॉ. अमित देवे, जयेश लोखंडे, अॅड. विक्रांत घरत, ओबीसी जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नौफील सय्यद, महिला जिल्हाध्यक्ष निर्मला म्हात्रे, इशिका सुधीजा, प्रेमा आप्पाचा, नीता शेनॉय, युवक काँग्रेसचे पनवेल विधानसभा अध्यक्ष विश्वजीत पाटील, प्रदेश सचिव प्रशांत पारवे, काशिफ इमाम, सोशल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष अभिजित पाटील, सुधीर मोरे, अम्मार मदार, रुपेश घरत, विलास देरे, कपिल यादव, शाहीद मुल्ला, वसीम पटेल, दीपक सुधीजा, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments