कर्तव्याच्या पलीकडे जाऊन पोलिसांची लोकाभिमुख सेवा

पनवेल, ता. ४ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डेरवली–पळस्पे मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांनाही या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांना मोठा दिलासा दिला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भालचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साबळे आणि पोलीस अंमलदार भोळे यांनी केवळ वाहतूक नियमन करण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले.मुसळधार पाऊस, चिखल आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हे काम केले.
या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, नोकरदार, विद्यार्थी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला होता. अनेक वाहनचालकांना वाहनांचे नुकसान सहन करावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तत्काळ कृती करत उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली.पोलिसांच्या या उपक्रमामुळे वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला असून वाहनचालकांनीही या कामाचे स्वागत केले. पोलिसांची जबाबदारी केवळ वाहतूक नियमन किंवा कायदा-सुव्यवस्था राखण्यापुरती मर्यादित नसून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची त्यांची भूमिका या उपक्रमातून अधोरेखित झाली."जनतेची सेवा हीच खरी कर्तव्यपूर्ती" या भावनेतून करण्यात आलेल्या या लोकाभिमुख उपक्रमामुळे पनवेल शहर वाहतूक शाखेच्या कार्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्याबरोबरच सामाजिक उत्तरदायित्व जपत पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments