उलवे, दि. २१ जून : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, उलवे आणि जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खारकोपर तलाव, सेक्टर-९, उलवे येथे शनिवारी सकाळी भव्य सामूहिक योग कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि योगप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या प्रेरणेतून जगभर साजरा होत असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात सामूहिक योगाभ्यास, प्राणायाम आणि विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. उपस्थितांनी योगाचे महत्त्व जाणून घेत निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.
कार्यक्रमात भारतीय जनता पक्ष आणि जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उलवे पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, श्री कच्छी लेवा पटेल समाज, मीना योगा ग्रुप, बुद्धिस्ट वेल्फेअर कमिटी तसेच "आम्ही उलवेकर मित्र मंडळ" आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष आणि भाजप नेते श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून आरोग्य, सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी बोलताना प्रितम म्हात्रे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीमुळे योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी शरीर, शांत मन आणि सुदृढ समाज घडविण्याचा प्रभावी मार्ग आहे. आज उलवेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा 'निरोगी भारत' संकल्पनेला बळ देणारा आहे."कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पार्टी, उलवे आणि जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित नागरिकांनीही अशा आरोग्यवर्धक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
"करू योग, राहू निरोग… हाच भारताचा नवा संकल्प!" असा संदेश यावेळी देण्यात आला.
0 Comments