कामोठे येथे स्व. मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न

कामोठे | प्रतिनिधी :समाजसेवा, आरोग्य जनजागृती आणि मानवतेचा संदेश देणारे स्वर्गीय मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेले भव्य महाआरोग्य शिबिर कामोठे येथे उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाले. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र (रविशेठ) जोशी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही यशस्वीरीत्या पार पडला.स्व. मितेश रवींद्र जोशी यांच्या पवित्र स्मृती जपण्यासाठी रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट आणि साई द्वारका हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विनामूल्य महाआरोग्य शिबिर, भव्य रक्तदान शिबिर तसेच ज्येष्ठ नागरिक सन्मान उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत समाजसेवेची परंपरा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.महाआरोग्य शिबिरामध्ये कामोठे परिसरातील नागरिकांसाठी विविध आजारांच्या तपासण्या, आरोग्य सल्ला आणि आवश्यक मार्गदर्शन पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले, तर अनेक गरजू नागरिकांना चष्म्यांचेही वितरण करण्यात आले.
या शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शिबिरादरम्यान १३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, तर ४०० नागरिकांची रक्तदाब (बीपी) तपासणी आणि १०० नागरिकांच्या ईसीजी तपासण्या करण्यात आल्या. हजारो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतल्याने संपूर्ण परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.समाजहिताचा वारसा जपत रवींद्र जोशी यांच्या पुढाकारातून दरवर्षी आयोजित होणारे हे महाआरोग्य शिबिर केवळ आरोग्यसेवेपुरते मर्यादित न राहता सामाजिक एकात्मता, सेवाभाव आणि लोककल्याणाचा आदर्श निर्माण करणारे ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments