लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित ‘निष्पाप’ नाट्यप्रयोगला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल (प्रतिनिधी):दानशूर व्यक्तिमत्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मुंबई मराठी पत्रकार संघ प्रस्तुत ‘निष्पाप’ या नाटकाचा विशेष प्रयोग उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. पनवेल येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित या प्रयोगाला प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी वैशाली देशमुख, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व नाटकाचे निर्माते संदीप चव्हाण, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन तसेच नाट्यप्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. अमृत महोत्सव वर्षनिमित्त यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
चोवीस तास बातम्यांच्या जगात वावरणाऱ्या पत्रकारांच्या संवेदनशीलता आणि सर्जनशीलतेला रंगभूमीवर योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने मुंबई मराठी पत्रकार संघाने पहिल्यांदाच ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि पदार्पणातच दोन पुरस्कार पटकावण्याचा मान मिळवला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ प्रस्तृत या नाटकाने पत्रकारांच्या संवेदनशीलतेचा आणि अंतर्मनातील संघर्षाचा प्रभावी आविष्कार रंगमंचावर साकारला. प्रेक्षकांनी नाटकाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण निर्मित या नाटकाचे लेखन प्रा. दिलीप परदेशी यांचे असून दिग्दर्शन गुरुदत्त लाड यांनी केले आहे. प्रमुख भूमिकेत ज्येष्ठ पत्रकार देवदास मटाले आणि स्वाती घोसाळकर यांनी प्रभावी अभिनय सादर केला. तसेच गुरुदत्त लाड, प्रशांत चिडे, रश्मी महांबरे, सिद्धेश शिगवण आणि सुरेश ठुकरुळ यांनीही आपल्या भूमिकांद्वारे नाटकाला समर्थ साथ दिली. हा नाट्यप्रयोग केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता पत्रकारितेच्या क्षेत्रातील भावविश्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा ठरला असून, उपस्थितांकडून त्याचे विशेष कौतुक करण्यात आले.

Post a Comment

0 Comments