फुफ्फुसात रक्ताची गुठळी आणि ४ किलोची गर्भाशयातील गाठ; दुहेरी संकटावर मात

नवी मुंबई, प्रतिनिधी : फुफ्फुसात रक्ताची गुठळी (पल्मोनरी एम्बोलिझम) आणि गर्भाशयातील तब्बल ४ किलो वजनाची गाठ अशा दुहेरी जीवघेण्या समस्यांवर मात करत ५१ वर्षीय महिलेचा जीव वाचवण्यात मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले आहे. तातडीची उपचारपद्धती आणि बहुविभागीय तज्ज्ञांच्या समन्वयामुळे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील रहिवासी ओनिझा गीते या गेल्या आठ महिन्यांपासून विविध आरोग्य समस्यांनी त्रस्त होत्या. त्यांना अचानक धाप लागणे, पोटऱ्यांमध्ये वेदना, चक्कर येणे आणि बेशुद्ध पडणे अशी गंभीर लक्षणे दिसल्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.सीटी पल्मोनरी अँजिओग्राफी तपासणीत त्यांच्या फुफ्फुसाच्या मुख्य धमन्यात मोठी रक्ताची गुठळी (सॅडल पल्मोनरी एम्बोलिझम) आढळून आली. ही अत्यंत धोकादायक स्थिती असून त्वरित उपचार न केल्यास जीवाला धोका संभवतो. तसेच तपासणीत गर्भाशयात मोठ्या आकाराची फायब्रॉइड गाठ असल्याचेही स्पष्ट झाले. ७ फेब्रुवारी रोजी इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्टांनी कॅथेटरद्वारे थ्रोम्बेक्टॉमी आणि थ्रोम्बोलिसिस प्रक्रिया करून फुफ्फुसातील गुठळी काढण्यात यश मिळवले. त्यानंतर भविष्यात धोका टाळण्यासाठी आयव्हीसी फिल्टर बसवण्यात आले.रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञांच्या पथकाने तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेतून गर्भाशयासह ३० सेंमी आकाराची आणि सुमारे ४ किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढून टाकली.शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर आयसीयूमध्ये उपचार करून तिची प्रकृती सुधारली. १८ फेब्रुवारी रोजी तिला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आणि पुढील पुनर्वसन उपचार सुरू करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून ती दैनंदिन कामे करू लागली आहे.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, हार्मोनल बदल आणि दीर्घकाळ हालचालींचा अभाव यामुळे पल्मोनरी एम्बोलिझमचा धोका वाढतो. सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. रुग्ण ओनिझा गीते यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या वेळेवर उपचारांमुळे मला नवे आयुष्य मिळाले.

Post a Comment

0 Comments