पनवेल (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसांपासून पनवेल ते खारघर परिसरातील विविध ठिकाणी जाणूनबुजून वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.या संदर्भात शुक्रवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत डीसीपी प्रशांत मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, तसेच एमएसईबीचे अधिकारी डी. आर. पाटील यांच्यात बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी संप मागे घेतल्याची कबुली दिली, तसेच पुढील एक ते दीड तासांत वीजपुरवठा पूर्ववत होईल, असे आश्वासन दिले. याशिवाय, वीजपुरवठा खंडित करण्यामागे जबाबदार ठरलेल्या कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कालही या विषयावर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीला उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंजारराव, केदार भगत, पिंट्या उर्फ प्रीतम म्हात्रे, रुपेश नागवेकर, पवन सोनी, उमेश इनामदार, एनपी बिल्डर्सचे प्रशांत पाटील, तसेच ओरियन मॉलचे पूर्णंदू साळवी यांच्यासह स्थानिक व्यापारी व उद्योजक उपस्थित होते.बैठकीनंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, संपाच्या आड नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर संतप्त ताशेरे ओढले. त्यांनी म्हंटले कि, पनवेल पासून खारघरपर्यंत विविध ठिकाणी परवाच्या दिवसापासून वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या विरोधात नागरिक प्रचंड संतप्त झाले होते त्यांनी एमएसईबी, एमएसईडीसीएल पोलीस स्टेशन गाठले. संपाचा गैरफायदा घेत जाणीवपूर्वक वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रकार घडले. त्यामुळे या संदर्भात आज डीसीपी प्रशांत मोहिते यांच्या सोबत बैठक घेतली. पनवेलच्या बाजारपेठेत तर प्रचंड प्रमाणात उद्रेक पहायला मिळाला. मोहोल्ला विभागातील नागरिकांची लाईट नव्हती एसटी डेपो व रेल्वे स्थानक नजीक झोपड्पट्टीमंध्येही तीच परिस्थिती होती त्यामुळे काहींनी रास्ता रोको केला. हि वेळ ज्यांच्यामुळे आली ज्यांनी जाणीवपूर्वक वीज पुरवठा खंडित केला आणि कुठला वीज पुरवठा खंडित करायचा हे ज्ञान आहे अशाच लोकांनी ते कृत्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी डीसीपी प्रशांत मोहिते यांच्याकडे केली असल्याचे सांगितले. आता संप मिटला आहे मात्र कुणी विनाकारण वीज पुरवठा बंद केला तर आम्हाला कळवा, आमचे भाजपचे पदाधिकारी निश्चितच या संदर्भात पाठपुरावा करतील. नागरिकांना त्रास झाला आहे, त्याच्यावर ईलाज झाला पाहिजे पुन्हा अशा पद्धतीने मनमर्जी करत नागरिकांना त्रास होऊ नये आणि त्यासाठी पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील दोषींना शासन करावे, असे अधोरेखित केले.
0 Comments