पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर प्रभाग १४ मधील भाजप महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचे ठामपणे सांगितले. या परिसरात ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचा पाठिंबा महायुतीच्या उमेदवारांना मिळत आहे. ताफ्यामुळे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. खांदा वसाहत येथे झालेल्या या जोरदार प्रचारादरम्यान प्रभाग १४ चे उमेदवार इकबाल हुसेन काझी, सारिका अतुल भगत, सतीश दत्तात्रेय पाटील आणि रेणुका मयुरेश नेतकर यांच्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे यांनी मतदारांशी संवाद साधला.महायुती केवळ विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असून, हे चारही उमेदवार आपल्या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच येत्या १५ तारखेला 'कमळ' या चिन्हासमोरील बटण दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. प्रचारादरम्यान ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले आणि विजयाचा आशीर्वाद दिला. यावेळी , पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, वर्षा ठाकूर, माजी नगरसेवक मुकीत काझी, गणपत म्हात्रे, माजी नगरसेविका हेमतला म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, जितेंद्र म्हात्रे, आरपीआयचे शहराध्यक्ष निलेश सोनावणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात महायुतीचा प्रचार आता वेगवान झाला असून, खांदा वसाहतीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचार करण्यात आला.
0 Comments