पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल यात आमच्या मनात कोणतीही शंका नाही, असे प्रतिपादन सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कृती समितीच्या बैठकीत सर्वांसमोर या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. येत्या तीन महिन्यांच्या आत विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव लागलेले आपण पाहू. ते पुढे म्हणाले, आज जे विरोधक या दि.बा.च्या नावा संदर्भात शंका उपस्थित करत आहेत, त्यांनी पूर्वी लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाबाबत काय भूमिका घेतली होती, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे विरोधकांचा उथळपणा स्पष्ट दिसतो आणि उथळ पाण्याला नेहमी खळखळाट जास्त असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत दिलेल्या आश्वासनावर आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचे सांगत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, आपल्या देशातील मोदी सरकार आणि महाराष्ट्र राज्यातील फडणवीस सरकार आपल्या शब्दाचे पालन करणारे आहेत. निश्चितच विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव लागेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0 Comments