ट्रायसिटी- सेक्टर ३४, खारघर येथे भीषण आग-आर.ए.एफ.च्या शौर्यामुळे वाचले असंख्य जीव!

 प्रतिनिधी /खारघर :ट्रायसिटी, सेक्टर ३४, खारघर येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास एका उंच इमारतीच्या १७व्या आणि १८व्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीने परिसरात खळबळ उडवली. आगीच्या ज्वाळा आणि घनदाट धुरामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी कमांडर एस. के. प्रधान यांच्या नेतृत्वाखालील आर.ए.एफ. (Rapid Action Force) पथक काही मिनिटांत दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ बचाव मोहीम हाती घेतली. जवानांनी जीवाची पर्वा न करता धुराने भरलेल्या मजल्यांवर चढून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या जलद आणि अचूक कृतीमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले आणि एक मोठी दुर्घटना टळली. स्थानिक नागरिकांनी आर.ए.एफ.च्या या शौर्य पूर्ण आणि मानवतावादी कार्याचे कौतुक केले. 
या प्रसंगी काँग्रेस पनवेल शहर जनरल सेक्रेटरी डॉ. शिल्पा पाठक ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन आर.ए.एफ.च्या जवानांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, कमांडर प्रधान आणि त्यांच्या टीमने दाखवलेले धैर्य व तत्परता ही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा वीर जवानांमुळेच नागरिकांचे प्राण सुरक्षित राहतात. डॉ. ठाकूर यांनी आगीत बाधित झालेल्या कुटुंबांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. स्थानिक प्रशासनानेही आर.ए.एफ.च्या जलद प्रतिसादाचे आणि बचाव कार्याचे कौतुक केले आहे.



Post a Comment

0 Comments