
पनवेल (प्रतिनिधी) तरुणांची सर्वात जास्त संख्या असलेला जगातील सर्वात मोठा आपला भारत देश आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवाशक्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. या युवाशक्तीच्या जोरावर आपला देश २०४७ साली विकसित देश होणार आहे, त्यामुळे देशातील युवक युवतींनी देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी युवकांशी संवाद साधताना केले. यावेळी नामदार आशिष शेलार यांनी युवकांशी सहज, सरळ आणि सोप्या शैलीत संवाद साधला. युवाशक्ती काय करू शकते याचे उदाहरणासह त्यांनी युवाशक्तीचे महत्व अधोरेखित केले. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि लोकशाही जगातीत सर्वोत्कृष्ट असल्याचे त्यांनी नमूद करतानाच ती देशाची ताकद असल्याचे सांगितले. देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.

त्या अंतर्गत युवकांच्या पुढील वाटचालीकरिता 'विकसित भारत विकसित महाराष्ट्र' या शिर्षकाखाली पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने 'युवा संवाद मेळावा' हजारो युवकांच्या उपस्थितीत आणि मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी युवकांशी थेट संवाद साधला. यावेळी व्यासपिठावर प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे आदी उपस्थित होते. या मेळाव्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, मंडल अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.
नामदार आशिष शेलार यांनी युवकांशी पुढे संवाद देताना म्हंटले कि, आपला देश विविध भाषा, संस्कृती, निसर्ग आणि विविध परंपरेने नटलेला एकसंघ देश आहे. आपल्या देशाशेजारील देशांची काय बिकट परिस्थिती झाली आहे ती आपण सर्वजण जाणताच आहात. श्रीलंकेची लोकशाही गेली, पाकिस्तान, बांगलादेश आणि आता नेपाळची परिस्थिती कशी वाईट झाली हे सर्वांनी बघितले आहे, पण आपल्या देशात घरातूनच संस्कार मिळत आहेत त्यामुळे आपला भारत जगातील सर्वात समृद्ध लोकशाही असलेला देश आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला देश शंभर वर्षांचा होईल तेव्हा म्हणजेच सन २०४७ ला आपला देश विकसित देश म्हणून गणला जाणार आहे. जागतिक दर्जाचे विविध प्रकल्प या परिसरात येत असल्याने देशाच्या विकासाचे केंद्र पनवेल रायगड होणार आहे. त्यामुळे येथील तरुणांना शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि करिअरच्या विविध क्षेत्रातील संधी मिळणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात विकासाचे पर्व आणले. त्या माध्यमातून देशाचे संरक्षण, रोजगार, शिक्षण, व्यवसाय मजबूत करण्याचे काम झाले. त्या अनुषंगाने आत्मनिर्भर भारत, स्वदेशी आणि स्वाभिमानी भारत निर्माण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आपल्या शास्त्रज्ञांमध्ये ताकद होती मात्र व्यवस्था नव्हती पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बळ दिले आणि क्रांती घडली. मिशन चांद्रयान यशस्वी झाले तसेच एकाचवेळी १०३ सॅटेलाईट अवकाशात झेपवण्याची किमया एकमेव आपल्या देशाने केली. पंतप्रधान झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी विविध योजना अंमलात आणल्या. काँग्रेसच्या काळात होणारा भ्रष्टाचार सर्वांनीच पाहिला आहे. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेतील दलाल दूर करण्यासाठी लाभार्थीच्या थेट बँकेच्या खात्यात जमा करण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलले. त्यामुळे मोदी सरकारमुळे लाभार्थीला त्याच्या हक्काचे लाभ मिळायला लागले. अशा अनेक योजनांच्या माध्यमातून तळागाळीत माणसाचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे, असेही त्यांनी विकासकामांच्या अनेक उदाहरणासह देशाच्या जडणघडणीचा विस्तार संवादातून युवकांसमोर मांडला. त्याचबरोबर त्यांनी सोशल मीडिया संदर्भात तरुणांना सतर्कतेचा सल्ला दिला. तसेच देशाचे सजग आणि सतर्क नागरिक बना, जगातील विकसित देशांच्या रांगेत अभिमानाने उभा राहील. त्या वाटचालीत युवकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच प्रत्येक युवक-युवतीने स्वतःचा विकास साधत देशाच्या प्रगतीत हातभार लावावा, असेही नामदार अॅड. आशिष शेलार यांनी संवाद मेळाव्यात म्हंटले. या मेळाव्याचे प्रास्ताविक आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देश आणि राज्याच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाचा आणि कार्याचा गौरव व उहापोह केला. त्याचबरोबरीने मंत्री आशिष शेलार यांनी पीओपी मूर्तिकारांसाठी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल तसेच सण आणि उत्सवांना समाजाला जोडण्याचा कार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
0 Comments