पनवेल (प्रतिनिधी) पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच उद्योग व्यवसायातून अर्थाजन केले पाहिजे अशी त्यांची विचारसरणी होती. त्यामुळे विद्यार्थिनींनीसुद्धा स्वावलंबी जीवनासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हीच खरी कर्मवीरांना गुरुवंदना ठरेल असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेचे ज्येष्ठ सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. सोलापूर शहरातील सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य वाय.टी. देशमुख, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांच्यासह कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायामध्ये गुणवत्ता दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. दर्जेदार उत्पादनास मागणी आहे. म्हणून विद्यार्थिनींनी मध्यम व लघु उद्योग व्यवसायातून अर्थाजन केल्यास त्यांचा भविष्यकाळ उज्वल होईल असे सांगितले तर प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या अत्याधुनिक जयकुमारजी पाटील कौशल्य विकास केंद्रात कार्यान्वित असलेल्या ब्युटी पार्लर, फॅशन डिझाईन, फूड प्रोसेसिंग, इंग्लिश स्पिकिंग, संगणकाचे कोर्सेस, योगा सेंटर, कार ड्रायव्हिंग, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, टॅली, शेअर मार्केटिंग, स्पर्धा परीक्षा, बँकिंग परीक्षा या उपक्रमांचे कौतुक केले. दरम्यान संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयाच्या परिसरात मुलींसाठी अद्यायावत वसतिगृह साकारण्यात येणार असल्याचे प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे यांनी सांगितले. त्यावेळी आपल्याद्वारे यथाशक्ती योगदान दिले जाईल असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
0 Comments