प्रभावी वकृत्व शैली महत्त्वाची गुरुकिल्ली - मयुरेश नेतकर

पनवेल (प्रतिनिधी) "उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रभावी वकृत्व शैली ही एक अत्यंत महत्त्वाची गुरुकिल्ली आहे," असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी केले. महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशन आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धेच्या वर्ग अंतर्गत फेऱ्या सुरू आहेत. त्या अनुषंगाने स्पर्धा प्रमुख म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना म्हंटले. ते पुढे म्हणाले की, "वकृत्वशैली" हा शब्द फक्त बोलणे किंवा भाषण देणे इतकाच मर्यादित नाही. हा शब्द आहे व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावशाली अभिव्यक्तीचा. भविष्य उज्ज्वल करायचे असेल, तर विचारांइतकीच त्यांची मांडणीही प्रभावी असली पाहिजे. आणि हीच ताकद आपल्याला वकृत्वशैली देते.
आजच्या युगात केवळ ज्ञान असून उपयोग नाही. ते ज्ञान आत्मविश्वासाने, संयमाने आणि योग्य शब्दात मांडता आलं पाहिजे. राजकारण असो, व्यवसाय असो, शिक्षण असो किंवा कोणतंही क्षेत्र वकृत्व हेच यशाचं द्वार उघडण्याचं साधन आहे.वकृत्व म्हणजे केवळ मोठ्या शब्दांत भाषण देणं नव्हे, तर समोरच्याच्या मनाला स्पर्श करणं, त्यांच्या भावना समजून घेऊन संवाद साधणं हाच खरा संवादाचा आत्मा असतो. आज आपण पाहतो की नेतृत्व हे प्रभावी संवादातून जन्म घेतं. उत्तम वक्ता हा केवळ श्रोत्यांचं लक्ष वेधून घेत नाही, तर त्यांच्या मनात विचारांची ठिणगीही पेटवतो.त्यामुळे शालेय जीवनापासून वकृत्वाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे, आणि ते काम कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका करत आहे, असेही मयुरेश यांनी अधोरेखित केले.

Post a Comment

0 Comments