सी. के. टी. विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; संचालिका वर्षा ठाकूर यांची प्रमुख मान्यवर म्हणून लाभली उपस्थिती

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सी. के. टी. विद्यालयाच्या प्राथमिक विभागातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुपौर्णिमाचे औचित्य साधून गुरु शिष्य परंपरा जोपासत अनोखी गुरुवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या संचालिका वर्षा ठाकूर यांची उपस्थिती लाभली.विद्यार्थी नेहमीच आपल्या गुरुचे अनुकरण करत अनेक गोष्टी शिकत असतो. शिक्षकांबरोबरच पालकांचे संस्कार पाल्यासाठी महत्वाचे असून त्यामधून मुलांची अधिक प्रगती होत असते, असे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या संचालिका वर्षा ठाकूर यांनी यावेळी आपल्या भाषणात नमूद केले. यावेळी मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट करत आजचा हा दिवस म्हणजे गुरु प्रती आदर आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. पुढे त्या म्हणाल्या की, गुरुमुळे आयुष्यातील अज्ञानाचा अंधःकार दूर होतो. गुरु आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि दिशा देऊन आयुष्य सुखकर जगायला शिकवतो. यावेळी गुरुप्रती आदर व्यक्त करत शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी, राज्यस्तरीय स्वच्छता मॉनिटर अभियानात मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल वर्षा ठाकूर यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांचे कौतुक केले. दरम्यान, मास्टरमाईंड, इंग्लिश मॅरेथॉन, ऑलिम्पियाड परीक्षा तसेच महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर तसेच किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप ऑल इंडिया डान्स स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरील प्रावीण्य मिळवलेल्या विजेत्याचे कौतुक करून त्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी उपाध्यक्ष अनुराधा सुर्यवंशी, सचिव माधुरी धनावडे, मराठी माध्यम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका नीरजा अधुरी, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका वैशाली पारधी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments