'वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणानिमित्त पनवेल महानगरपालिकेचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

पनवेल, दि. १२ : भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वरतिरंगा – तरुण स्वरांतून राष्ट्रभक्तीचा बुलंद जयघोष!’ या संकल्पनेवर आधारित विशेष देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन जयराम पाटील होते. यावेळी सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार, महापालिकेचे नगरसेवक-नगरसेविका, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त अभिषेक पराडकर, उपायुक्त मंगला माळवी, उपअभियंता विलास चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना महापौर नितीन पाटील म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्ञात स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच अनेक अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनीही आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागातून निर्माण झालेली राष्ट्रभक्तीची भावना विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. आजही देशाच्या सीमेचे रक्षण करणारे सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता देशसेवा करत आहेत. या सर्वांच्या त्यागाचे स्मरण ठेवून नागरिकांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा, असे आवाहन त्यांनी केले.
परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित आणि ‘देवकी मीडिया’ प्रस्तुत ‘स्वरतिरंगा’ या कार्यक्रमात झी हिंदी सारेगमप फेम मिथिला माळी, उत्कर्ष चंदनशिवे, समृद्धी जाधव, निर्जला वाल्मिकी आणि अमोल चव्हाण या युवा गायक-गायिकांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. सेलिब्रिटी अँकर विनीत देव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून नव्या पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
 ‘ऐ मेरे वतन के लोगो’, ‘जहाँ डाल डाल पर’, ‘मेरे देश की धरती’, ‘आय लव्ह माय इंडिया’, ‘जय हो’, ‘संदेसे आते हैं’ यांसह अनेक देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. या गीतांच्या सादरीकरणाने रसिकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ‘मेरे देश की धरती’ या गीतावरील नृत्याविष्काराने उपस्थितांची विशेष दाद मिळवली.स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलकरांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक वेगळा आणि उत्साहपूर्ण सांगीतिक अनुभव मिळाला. कार्यक्रमासाठी अत्याधुनिक ध्वनी व प्रकाशयोजनेचा वापर करण्यात आला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पनवेल महानगरपालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांनी केले. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित ‘स्वरतिरंगा – तरुण स्वरांतून राष्ट्रभक्तीचा बुलंद जयघोष!’ या कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी आणि रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

0 Comments