प्रतिनिधि (खोपोली): शिळफाटा येथील स्व. इंदिरा गांधी चौक परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येची गंभीर दखल घेत आमदार महेंद्रशेठ थोरवे तसेच नगराध्यक्ष कुलदीपक  शेंडे यांच्या विनंतीनुसार मावळचे महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन सादर करण्यात आले. नगरसेवक हरीश काळे व माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शिळफाटा बाजारपेठ रस्ता व इंदिरा गांधी चौक रस्ता हे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले.या निर्णयामुळे शिळफाटा परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.