पनवेल (प्रतिनिधी): थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि नाद ब्रह्म साधना मंडळाच्यावतीने निर्मित करण्यात आलेल्या 'प्रचलित रागांवर आधारित ७५ अभंगांचे लोकार्पण शनिवार दिनांक १८ एप्रिल रोजी सायंकाळी ०५ वाजता पनवेल येथे होणार आहे. मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव व नगरसेवक परेश ठाकूर, पं. निवृत्तीबुवा चौधरी, नाद ब्रह्म साधना मंडळाचे अध्यक्ष वसंत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या अभंगांची रचना व सादरीकरण विविध अनवट आणि पारंपरिक रागांवर आधारित चालींमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे नवोदित विद्यार्थी, शिष्यवर्ग आणि संगीत अभ्यासकांना रागांची शास्त्रशुद्ध व सुसूत्र ओळख होण्यास मोठी मदत होणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेतील रागसंवर्धन आणि सातत्यपूर्ण जतन हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असून या उपक्रमामुळे भक्ती, संगीत आणि संस्कार यांचा सुंदर संगम समाजास अनुभवता येणार आहे. अभंगांच्या माध्यमातून आध्यात्मिक मूल्यांची जपणूक होऊन नव्या पिढीसमोर एक आदर्श उभा राहणार आहे. या उपक्रमामुळे अमृत महोत्सव वर्षाला आणखी एक सांस्कृतिक व आध्यात्मिक अधोरेखा लाभली आहे.
0 Comments