खारघर (प्रतिनिधी) : खारघर परिसरातील आदिवासी वाडीत एत्तान फाउंडेशनच्या वतीने लहान, गरीब व गरजू मुलांसाठी फळवाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. समाजातील वंचित घटकांपर्यंत आनंद पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला असून, स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.या उपक्रमाअंतर्गत अनेक गरजू व वंचित मुलांना ताज्या व पौष्टिक फळांचे वाटप करण्यात आले. मुलांच्या आरोग्याचा विचार करून आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे लहानग्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहण्यासारखे होते. यावेळी स्वयंसेवकांनी मुलांशी संवाद साधत आरोग्याचे महत्त्वही पटवून दिले.
या प्रसंगी एत्तान फाउंडेशनच्या शिल्पा पाठक ठाकूर यांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना चांगल्या सवयी, शिक्षणाचे महत्त्व आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी सकारात्मक विचारांची गरज याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांना प्रेरणादायी गोष्टी सांगत त्यांच्या आत्मविश्वासात भर घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या संवादामुळे मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.इयत्ता ८ वी तील एत्तान ठाकूर हा एत्तान फाउंडेशनच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असून, लहान वयातच सामाजिक कार्यात त्याचा सहभाग प्रेरणादायी ठरत आहे.एत्तान फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. शिल्पा ठाकूर या व्यवसायाने प्राध्यापक असून, त्यांचा ठाम विश्वास आहे की मुले अनुभव आणि प्रत्यक्ष पाहण्याद्वारे अधिक प्रभावीपणे शिकतात. त्यांच्या मते, मुलांचा सर्वांगीण (३६०अंश) विकास देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. लहान वयातच मुले गोष्टी आत्मसात करू लागतात आणि त्यांच्या विचारांची पद्धत तयार होऊ लागते. त्यामुळे त्यांच्या आई व कुटुंबाच्या प्रगतीचाही यात महत्त्वाचा वाटा असून, त्या त्यांनाही शिक्षित करण्यावर भर देतात.
हीच त्यांची शिकवण्याची पद्धत असून, या दृष्टिकोनातून त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. सध्या त्या हाच प्रभावी दृष्टिकोन एत्तान फाउंडेशनच्या उपक्रमांमध्येही वापरत आहेत, ज्यामुळे सामाजिक कार्याला एक वेगळी दिशा मिळत आहे.या प्रसंगी एत्तान फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. शिल्पा ठाकूर, एत्तान ठाकूर, सचिव अभिनव ठाकूर, खजिनदार निशा पाठक, तसेच रोशन रॉय, करिना रॉय, कार्यवाह आणि इतर पदाधिकारी तसेच उत्साही स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.एत्तान फाउंडेशनतर्फे अशा सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन पुढील काळातही सातत्याने करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. समाजातील गरजू घटकांसाठी असे उपक्रम आशेचा किरण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
0 Comments