सिंचन विभागाकडून बिनशर्त जागा मंजूर; मंत्री गिरीश महाजन यांची मान्यता

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शहापूर तालुक्यात नवोदय विद्यालय उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला आहे. शहापूर तालुक्यातील भातसानगर येथे प्रस्तावित नवोदय विद्यालयासाठी सिंचन विभागाकडून बिनशर्त जागा मंजूर करण्यात आली असून, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावास अंतिम मान्यता देण्यात आली.कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ८९ वी बैठक बुधवारी सिंचन भवन, ठाणे येथे पार पडली. या बैठकीत नवोदय विद्यालयासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ व कल्याण तालुक्यांतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जवळच नवोदय विद्यालयाची सुविधा उपलब्ध होणार आहे.कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र नवोदय विद्यालयाची मागणी सातत्याने लावून धरली होती. यासाठी जिल्हा परिषदेचा ठराव, शासनाकडे केलेला पाठपुरावा आणि स्थानिक गरज लक्षात घेऊन २०२४ साली शासनाने ठाणे जिल्ह्यात नवोदय विद्यालय स्थापनेस मंजुरी दिली होती. आता जागेसाठी अंतिम मंजुरी मिळाल्याने प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.या निर्णयानंतर आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण व निवासी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.शहापूरसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, नवोदय विद्यालय उभारणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यासाठी प्रशासनाशी समन्वय ठेवून पुढील पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments