पनवेल (प्रतिनिधी) उरण–नेरूळ रेल्वे मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. उरण परिसरातील नागरिक, दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, महिला व व्यावसायिक यांच्या वाढत्या मागणीची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.आमदार महेश बालदी यांची मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या वाढीव लोकल फेऱ्या नववर्षाच्या प्रारंभी सुरू होणार आहेत. निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर सकाळी ६.०५ वाजता सुटणारी पहिली गाडी तसेच रात्री उशीरा धावणाऱ्या अतिरिक्त लोकल्स यांचा औपचारिक शुभारंभ केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे.फेऱ्यांच्या वाढीमुळे उरण, जासई, खारकोपर, गव्हाण आणि नेरूळ या परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. उरण–नेरूळ मार्ग हा उरण उपनगरे, जेएनपीटी क्षेत्र, औद्योगिक पट्टा तसेच नवी मुंबई–मुंबईमध्ये कामधंद्यासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वाढीव फेऱ्यांमुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन सकाळ-संध्याकाळच्या गर्दीचा ताणही कमी होणार आहे. या भेटीत केंद्रीय मंत्र्यांनी प्रकल्पासंदर्भातील पुढील आवश्यक सुविधांच्या पुरवठ्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. रेल्वे सेवांचा विस्तार हा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. उरण–नेरूळ रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ होणे हा उरण व आसपासच्या परिसरासाठी विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरेल, तसेच दैनंदिन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित व सोयीस्कर बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल आमदार महेश बालदी यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांना धन्यवाद दिले.
0 Comments