उरण, दि. २६ (प्रतिनिधी) – उरण नगरपरिषदेवर गेली अनेक वर्षे सत्ता असूनही भाजपनं शहराच्या विकासाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. मोरा परिसरातील नागरिकांना कचरा उचल न होणे, पाणीटंचाई, वीजपुरवठा खंडित राहणे, अस्वच्छ गटारे, निकृष्ट शौचालये, खड्डे पडलेले रस्ते अशा विविध समस्यांना सामोरं जावं लागत असून, तक्रार केल्यास नागरिकांना धमकावले जाते, नळ कनेक्शन बंद केले जातात, असा आरोप महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावनाताई घाणेकर यांनी केला. आता मात्र हा अन्याय सहन केला जाणार नाही. नागरिकांनी घाबरून न जाता आवाज उठवावा. महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. कोणाचीही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही, असे घाणेकर म्हणाल्या.मंगळवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मोरा येथील साईबाबा मंदिरासमोर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार मनोहरशेठ भोईर, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे उपजिल्हाध्यक्ष नरेश रहाळकर, गटनेते गणेश शिंदे, शेकापचे तालुका चिटणीस व कामगार नेते रवि घरत, सतीश पाटील, फहाद अहमद तसेच महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
सभेत बोलताना भावनाताईंनी आक्रमक शैलीत विरोधकांवर टीका करत जयवीन कोळी यांच्यावरही अनेक आरोप केले. महाविकास आघाडीने उभे केलेले सर्व उमेदवार सक्षम असून नगराध्यक्ष पदासाठी स्वतःला आणि नगरसेवक पदासाठी प्रभाग १ अ मधून प्रीती कोळी, १ ब मधून राकेश कोळी, २ अ मधून रसिका मेश्राम आणि २ ब मधून विक्रांत म्हात्रे यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.सभेत शेकापचे कामगार नेते रवि घरत यांनी केंद्र सरकारच्या चार श्रमकायद्यांवर टीका करत बेरोजगारी वाढल्याचे सांगितले. स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य दिले जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले. उरणचा विकास भावनाताईंच्या हातात दिल्यास आदर्श नगरपरिषद निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गटनेते गणेश शिंदे यांनी उरण नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीवर अंकुश नसल्याचा आरोप करत भवरा-मोरा परिसरातील अनेक विकासकामे शिवसेनेने केली असल्याचे सांगितले. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनीही सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना विकासापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत शिवसेनेने केलेली कामे जनतेसमोर मांडली.सभेत गोपाळ पाटील, नरेश रहाळकर, फहाद अहमद आदी मान्यवरांनीही मनोगते व्यक्त केली. एकूण सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत प्रचारसभेचे वातावरण उत्साहवर्धक झाले होते.
0 Comments