वार्ताहर / इंदिरानगर : देशातील जनतेच्या मनात असलेल्या निवडणूक प्रक्रियेवरील शंका आणि प्रश्नांची उत्तरे भाजपाने नव्हे तर निवडणूक आयोगाने द्यावीत, असे स्पष्ट मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव श्रुती म्हात्रे यांनी व्यक्त केले.‘वोट छोड’ या अभियानांतर्गत नाशिक शहर काँग्रेस आणि नाशिक शहर ओबीसी विभाग यांच्या वतीने रथचक्र चौक येथे स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्रुती म्हात्रे म्हणाल्या, देशातील जनतेच्या मनात मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. मतदान चोरी आणि निवडणूक प्रक्रियेतील भ्रष्टाचार यासंदर्भात स्पष्टता निवडणूक आयोगानेच द्यावी, भाजपाने यात लुडबूड करू नये. त्या पुढे म्हणाल्या, “भाजपाने मत चोरून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी सजग राहून आपल्या मताची चोरी होऊ देऊ नये. तसेच भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना निवडणुकीत जागा दाखवून द्यावी.”या प्रसंगी नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड म्हणाले, “मनपा निवडणुकीच्या निकालांमध्ये जनता चमत्कार घडवणार आहे. परिवर्तन आता अटळ आहे. भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांना नाशिक महानगरपालिकेत महाविकास आघाडी नेस्तनाबूत केल्याशिवाय गप्प बसणार नाही. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता जनआंदोलन उभे करेल, पण जनतेचे मत चोरू दिले जाणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
0 Comments