पनवेल / प्रतिनिधी : पनवेल शहरातील खराब रस्त्यांची दयनीय अवस्था आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधत भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत यांनी पालिका प्रशासनाला पत्र दिले आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून शहर खड्डेमुक्त करण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.हुतात्मा हिरवे गुरूजी मार्ग (जुने आदर्श हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा) हा मार्ग सध्या खड्ड्यांनी व्यापला असून, वाहनचालक आणि पादचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच कापड गल्ली, स्वामी हॉटेल ते गावदेवी मंदिर आणि तक्का येथील पेट्रोल पंपाजवळील रस्त्यांची परिस्थितीही अत्यंत बिकट झाली आहे. हे सर्व रस्ते शहरातील मुख्य वाहतूक मार्ग असल्याने नागरिकांना दररोज खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे.पावसाळ्यामुळे रस्त्यांची अवस्था अधिकच बिघडली होती, मात्र आता पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी भगत यांनी केली आहे.
त्यांनी पालिकेला “खड्डेमुक्त आणि धूळमुक्त पनवेल” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान, हनुमान मंदिर ते उरण नाका या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा मोठा ताण असल्याने परिसरात वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाहनचालक अतिवेगाने वाहने चालवत असल्याने शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि पादचारी यांना रस्ता ओलांडताना धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसविण्याची मागणीही केदार भगत यांनी त्यांच्या पत्रात केली आहे.पालिकेकडून या मागण्यांवर लवकरच कार्यवाही होईल, असे आश्वासन केदार भगत यांना मिळाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
0 Comments