पनवेल, 11 नोव्हेंबर - नवीन पनवेल शहरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नगरविकास विभाग, पनवेल महानगरपालिका आयुक्त यांचेकडे निवेदन दिले आहे. या निवेदनात नवीन पनवेल एचडीएफ सर्कल ते आदई सर्कल असा उड्डाणपूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.रिपाइं पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नविन पनवेलमध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. नवीन पनवेल परिसरात राहणाऱ्या लोकांना तसेच नवीन पनवेल मधुन सुकापूर, नेरे वाकडी, हरीग्राम ,देहरंग या ठिकाणी जाणार्या तसेच पनवेल महानगर पालिकेने विकसित केलेल्या दिलीप वेंगसरकर अकॅडमी येथे जाणार्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पनवेल-माथेरान रस्ता जरी मोठा असला तरी त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे.यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी उशीर होतो , अनेक वेळा रुग्णवाहिकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. इंधनाचा अपव्यय, प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.त्यामुळे नवीन पनवेल एचडीएफ सर्कल ते आदई सर्कल उड्डाणपूल बांधण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी केली आहे
0 Comments