समाजोपयोगी उपक्रमांना अनन्य साधारण महत्व - लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) लोकांसाठी काम करण्याची जाणीव म्हणजेच सामाजिक बांधिलकी असते त्यामुळे समाजोपयोगी उपक्रमांना अनन्य साधारण महत्व आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे केले. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ, वाहतूक पोलीस विभाग, नवीन पनवेल वेल्फेअर असोसिएशन यांच्या पुढाकारातून पनवेल रेल्वे स्थानकातील नवीन पनवेल बाजूस उभारण्यात आलेल्या अस्थायी वाहन पार्किंग सेवेचे उदघाटन तसेच हेल्मेट आणि वाहतूक पोलीस मित्र ओळखपत्राचे वाटप लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कामाची आस्था असेल तर काम करणे सोपे होते. माझ्या आयुष्यातील ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, तरीसुद्धा सामाजिक कार्य केल्याशिवाय स्वस्थ बसता येत नाही. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजासाठी कार्यरत राहिले पाहिजे. ‘केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे’ या भावनेतून प्रत्येकाने समाजकार्यात आपला वाटा उचलला पाहिजे,असेही त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी . देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, कार्यक्रमाचे आयोजक माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ, माजी नगरसेविका सुशीला घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, उमेश इनामदार, प्रशांत फुलपगार, सुधाकर थवई, विजय म्हात्रे, डॉ. अस्मिता घरत, नवीन पनवेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष ए. सी. झुल्का, श्री. देसाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते.लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, वाहतुकीची वर्दळ पाहता वाहन पार्किंग अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलीस अधिकारी औदुंबर पाटील, माजी नगरसेवक मनोज भुजबळ व संदीप पाटील, वेल्फेअर असोसिएशन यांनी रेल्वेशी समन्वय साधून अस्थायी स्वरूपात पण चांगल्याप्रकारे पार्किंग सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे हा समाजोपयोगी चांगला उपक्रम असल्याचे अधोरेखित केले. तसेच सर्वांनी वाहतुकीचे नियम व शिस्त पाळावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी वाहतुकीचे नियम या विषयावर मार्गदर्शन केले. तर प्रास्ताविकातून संदीप पाटील यांनी या पार्किंगसंदर्भात माहिती दिली. 

Post a Comment

0 Comments