उलवे, ता. १६ : लंडनमधून एम.एस्सी. इंटरनॅशनल बिझनेस ही पदवी डिस्टिंक्शनसह संपादन केलेल्या ओम शेखर देशमुखचा दिमाखात सत्कार माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शेलघर येथे पार पडला. आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी ओमच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून ती यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल कार्यक्रमाला विशेष महत्त्व लाभले.कार्यक्रमात बोलताना रामशेठ ठाकूर म्हणाले, माझा शिष्य महेंद्रशेठ उत्तम घडला आहे आणि इतरांनाही घडवत आहे. ओम देशमुखला लंडनला उच्च शिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय हा महेंद्रशेठ यांच्या मोठ्या मनाचे प्रतीक आहे. राजकीय प्रवाह भिन्न असले तरी आमच्यातील नाते कायम राहील.महेंद्रशेठ घरत यांनी या प्रसंगी सहकाऱ्यांच्या प्रगतीबद्दल आपली बांधिलकी अधोरेखित केली. आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. आपल्या सहकाऱ्यांची आणि त्यांच्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांनी उच्च शिक्षण घेऊन उत्तम नोकरी मिळवावी, यासाठी शैक्षणिक कर्जांचा वापर करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.लंडनमध्ये अत्यंत साधेपणाने राहूनही ओमने मिळवलेल्या डिस्टिंक्शनबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.गव्हाण गावातील लंडनमधून उच्च शिक्षण पूर्ण करणारा पहिला तरुण म्हणून ओम देशमुख गावाचा गौरव ठरल्याचे वाय. टी. देशमुख यांनी सांगितले. मराठा समाजातील या तरुणाने मिळवलेले यश अभिमानास्पद आहे; मात्र ही सारी किमया महेंद्रशेठ घरत यांनी पालकत्व स्वीकारल्यामुळेच शक्य झाली, असे ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना ओम देशमुख म्हणाला, “लंडनला जाण्यास मी तयार नव्हतो; परंतु महेंद्रशेठ यांनी मानसिक आधार देत माझा आत्मविश्वास वाढवला. शिक्षणकाळात ते सतत व्हिडिओ कॉलवरून विचारपूस करत आणि लंडनला येऊनही भेटत. त्यांनी कधी कमी पडू दिले नाही. त्यांचे उपकार मी आयुष्यभर लक्षात ठेवेन.”तसेच बीएमएस पदवी प्राप्त केलेल्या कवलज्योत सिंगचाही सत्कार करण्यात आला. त्याची आई बलजीत कौर म्हणाल्या, आमच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी महेंद्रशेठ यांनी घेतली. त्यांच्या मदतीमुळे आमचे कुटुंब उभे राहिले. कार्यक्रमास शेखर देशमुख, गुलाबशेठ घरत आणि एम. जी. ग्रुपचे सहकारी उपस्थित होते.
0 Comments