पनवेल (प्रतिनिधी): सिडकोने खारघर परिसराचा अपेक्षित पद्धतीने विकास न केल्यामुळे नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना अनेक मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत होता. सिडकोकडून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा होती, मात्र ते शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली आणि महापालिकेच्या माध्यमातून आता खारघर शहरात वेगाने आणि नियोजनबद्ध विकास होत असून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले.ते खारघरमध्ये आयोजित दैनंदिन बाजारांच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी बोलत होते. या बाजारांची निर्मिती आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या पुढाकारातून करण्यात येत असून एकूण १२ कोटी ४० लाख २३ हजार ६९१ रुपयांच्या निधीतून खारघरमधील १५ भूखंडांवर दैनंदिन बाजार उभारले जाणार आहेत. या कामांचे भूमिपूजन माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. यावेळी खारघर शहर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, गुरुनाथ गायकर, निलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, नेत्रा पाटील, कीर्ती नवघरे, उपाध्यक्ष संजय घरत, समीर कदम, प्रभाग क्रमांक ६ चे अध्यक्ष वासुदेव पाटील, उपाध्यक्ष किरण पाटील, शहर उपाध्यक्ष अजित अडसूळ, अमर उपाध्याय, खारघर शिवसेना अध्यक्ष प्रसाद परब, भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्षा साधना पवार, युवा मोर्चा शहर अध्यक्ष नितेश पाटील, प्रवीण बेरा तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
0 Comments