पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कारभारती पनवेल महानगर, संस्कृतभारती पनवेल आणि श्रीगुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'श्रीमद् भगवद् गीता पठन' स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यामध्ये परिसरातील स्पर्धकांनी मोठा सहभाग नोंदवत प्राथमिक फेरी यशस्वी केली. भगवद गीतेचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उदात्त उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.या स्पर्धेच्या निमित्ताने खांदा कॉलनी येथील सी. के. टी. महाविद्यालयातील केंद्रावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या सुसंस्कारित वाचनकौशल्याचा अनुभव घेत उपक्रमाचे कौतुक केले. तसेच गीतेचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला, असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. भारतीय संस्कृतीच्या परंपरेत श्रीमद् भगवद्गीता हे ग्रंथरत्न विशेष मानाचे स्थान राखून आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेले गीतेतील उपदेश आजही मानवाला सत्य, कर्तव्य, धैर्य आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतात. या आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रवाहाला नवे तेज देण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून काम केले जात आहे. ही स्पर्धा हा केवळ श्लोक पठणाचा कार्यक्रम नसून, विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात संस्कारांची पेरणी करण्याचा एक सुंदर प्रयत्न असतो. योग्य उच्चारण, छंद, लय आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे गीतेचे श्लोक सादर करताना विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसशांती विकसित होते. गीता पठण हे प्राचीन भारतीय वाङ्मयातील संगीतात्मक परंपरेचाही एक भाग आहे. श्लोकांच्या ध्वनीत एक विशिष्ट लय असते, जी मनाला स्थिर ठेवते. त्यामुळे स्पर्धेची तयारी करताना केवळ श्लोक पाठ होतात असे नाही; तर त्यांना संस्कृत भाषेचे सौंदर्य, तिचे व्याकरण आणि ध्वनी माधुर्य यांचाही परिचय होतो. यामुळे त्यांची भाषिक आणि बौद्धिक प्रगती अधिक दृढ होते. त्यामुळे श्रीमद् भगवद्गीता चे महत्व अनन्य साधारण आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेली 'श्रीमद् भगवद् गीता पठन' स्पर्धा प्राथिमक फेरी शालेय आणि खुला अशा दोन गटांमध्ये झाली. यामध्ये ३० हुन अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शालेय गटातील स्पर्धा पनवेलमधील गुजराती शाळा, नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालय आणि कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे तर खुला गटातील फेरी खांदा कॉलनी येथील सी. के. टी. महाविद्यालयातील केंद्रावर झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या सुसंस्कारित वाचनकौशल्याचा अनुभव घेत उपक्रमाचे कौतुक केले. "गीतेचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला," असे मत आमदार ठाकूर यांनी व्यक्त केले. या प्राथमिक फेरीवेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, गुरुकुलम न्यास अध्यक्ष मंजिरी फडके, संस्कृत भारतीच्या अनया करंदीकर, श्रीमती टिळक, योगेश पाटील, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय समेल, अमित चव्हाण यांच्यासह वैभव बुवा, शामनाथ पुंडे, कौस्तुभ सोमण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या प्राथमिक फेरी नंतर लवकरच अंतिम फेरी होणार आहे. त्यामध्ये प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असून, विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
0 Comments