पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वाढदिवस रद्द — राजकुमार पाटील यांचा संवेदनशील निर्णय

प्रतिनिधी/पनवेल: राज्यात आणि विशेषतः मराठवाडा भागात झालेल्या तीव्र पावसामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा विचार करून शिवशाही संस्थेचे अध्यक्ष राजकुमार पाटील यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरं आणि जनसंपर्क कार्यक्रमांद्वारे वाढदिवस साजरा केला जातो. मात्र, सध्याच्या कठीण परिस्थितीत अशा सोहळ्यांवर खर्च करण्यापेक्षा तो निधी पूरग्रस्त शेतकरी आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी वापरणे अधिक गरजेचे असल्याचे राजकुमार पाटील यांनी नमूद केले.त्यांनी स्पष्ट सांगितले की, वाढदिवसाचा खर्च समाजहितासाठी उपयोगात आणणे हेच खरी आनंदाची गोष्ट आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे घर, शेती आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा वेळी साजरा करण्याऐवजी मदतीचा हात पुढे करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.राजकुमार पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना आवाहन केले आहे की, यंदा वाढदिवसानिमित्त भेटवस्तू, फुले किंवा जाहिराती देण्याऐवजी त्या रकमेतून पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, कपडे किंवा आर्थिक मदत द्यावी. त्यांच्या या निर्णयाचे सामाजिक वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग असतो. पण यंदा परिस्थिती गंभीर असल्याने त्यांनी साजरा रद्द करून संपूर्ण निधी समाजहितासाठी देण्याचे ठरवले आहे.त्यांच्या या उपक्रमामुळे लोकप्रतिनिधी म्हणून असलेली सामाजिक जबाबदारी त्यांनी अधोरेखित केली आहे. तसेच त्यांनी पुढील काळातही गरजू शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे संकेत दिले आहेत.

Post a Comment

0 Comments