पनवेल, दि. 14 : पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पनवेल महानगरपालिकेस महाराष्ट्र शासनाच्या “माझी वसुंधरा अभियान - हरित यशोगाथा सन्मान २०२५” या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्य वातावरणीय कृती कक्षाचे संचालक अभिजीत घोरपडे यांच्या हस्ते हा सन्मान बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव (मुंबई) येथे झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या वतीने उपायुक्त स्वरूप खारगे, पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण आणि माझी वसुंधरा सल्लागार युवराज झुरंगे यांनी हा सन्मान स्वीकारला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या नेतृत्वात पर्यावरण विभागाने सर्व थीमॅटिक क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
तीन लाख ते दहा लाख लोकसंख्येच्या अमृत शहरांच्या गटात पनवेल महानगरपालिकेने सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. हा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि राज्य वातावरणीय कृती कक्ष यांच्या वतीने प्रदान करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेने शहरातील वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात चार फॉग कॅनन वाहने कार्यरत असून, दररोज विविध प्रभागांमध्ये सूक्ष्म पाण्याच्या फवारणीद्वारे धूळकणांचे नियंत्रण केले जाते. तसेच, एअर मॉनिटरिंग व्हॅनद्वारे शहरातील विविध भागांतील हवेची गुणवत्ता (Air Quality Index - AQI) नियमितपणे तपासली जाते. शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी लवकरच दहा एअर प्युरिफिकेशन सिस्टीम्स बसविण्याची योजना महानगरपालिकेने आखली आहे. यासोबतच रिअल टाइम एम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम आणि डिस्प्ले बोर्ड बसविण्याचे कामही सुरू आहे, ज्यामुळे नागरिकांना थेट हवेच्या गुणवत्तेबाबत माहिती मिळणार आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि नागरिकांना स्वच्छ, आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे हे प्रयत्न उल्लेखनीय ठरत आहेत.
0 Comments