मुंबई |(प्रतिनिधी ): भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाने ‘NEXT GEN GST REFORM अभियान’ राबविण्याची घोषणा केली आहे. या अभियानाचा उद्देश वस्तू आणि सेवा कर (GST) अधिक सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक बनवणे तसेच उद्योग, व्यापार, करदाते आणि सर्वसामान्य नागरिकांना थेट दिलासा मिळवून देणे हा आहे. या महत्त्वपूर्ण अभियानासाठी प्रदेश समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीचे संयोजक म्हणून माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री व राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांची निवड करण्यात आली आहे. तर विधान परिषदेचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांना सह संयोजक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि अर्थविषयक सखोल जाणिवेमुळे या अभियानाला नवे बळ मिळेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. समितीतील इतर सह संयोजकांमध्ये किरीट भन्साली कोषाध्यक्ष, मुंबई भाजपा, दीपक शिंदे माजी जिल्हाध्यक्ष आणि समीर बाकरे प्रदेश प्रवक्ता यांचा समावेश आहे. ही समिती व्यापारी, उद्योजक व करदात्यांच्या समस्या समजून घेऊन सुधारणा प्रक्रियेची दिशा ठरवणार आहे. ‘NEXT GEN GST REFORM अभियान’च्या माध्यमातून केवळ उद्योगपती वा व्यापाऱ्यांनाच नव्हे, तर सामान्य करदात्यांनाही दिलासा मिळणार आहे. जीएसटी प्रक्रियेतील क्लिष्टता कमी करून त्यात अधिक पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक आणि उद्योगवाढीस पोषक वातावरण निर्माण होईल, तसेच सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातही या सुधारणांचा थेट लाभ होईल, असा पक्षाचा विश्वास आहे. या महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल विश्वास दाखवल्याबद्दल ॲड. निरंजन डावखरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनःपूर्वक आभार मानले. सुधारणांसाठी सतत प्रयत्न करून जनहिताचे निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाचे त्यांनी विशेष कौतुक केले. प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी डावखरे यांच्यासह सर्व सह संयोजकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, महाराष्ट्रातील व्यापारी, उद्योजक, करदाते व सर्वसामान्यांसाठी ही समिती ठोस आणि परिणामकारक धोरणे मांडेल. जीएसटी सुधारणा अभियानामुळे महाराष्ट्र व्यापाराच्या दृष्टीने अधिक सक्षम आणि गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरेल. या घोषणेने व्यापारी व उद्योग क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली असून, महाराष्ट्रात आगामी काळात जीएसटी व्यवस्थेत मोठे बदल घडून येण्याची चिन्हे दिसत आहेत.
0 Comments