प्रतिष्ठित सवाई गंधर्व महोत्सवात रायगड नवी मुंबईला मानाचे पान

पनवेल (प्रतिनिधी) पं. सवाई गंधर्व यांच्या ७३ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्नाटक सरकारच्या कन्नड आणि सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कुंदगोळ येथिल ‘संगीत महोत्सवा’त रायगड भूषण पं. उमेश चौधरी यांना शास्त्रीय गायनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात पद्मश्री एम. वेंकटेश कुमार, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, विद्वान द्वारकिश एम., पं. गणपती भट यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या कलाकारांच्या सोबत पं. उमेश चौधरी यांना एकाच व्यासपीठावर गायनाची संधी मिळाली आहे. त्यामुळे रायगड-नवी मुंबईला या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित महोत्सवात मानाचे पान लाभले आहे. हा महोत्सव दिनांक १५ व १६ सप्टेंबर रोजी कर्नाटकमधील संगीत सम्राट सवाई गंधर्व स्मारक भवन येथे होणार असून, देशभरातील नामवंत गायक-वादकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.या संगीत महोत्सवाचे उद्‌घाटन १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीगलू, जगद्गुरू फकीर सिद्धाराम महास्वामीगलू यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी कर्नाटक राज्याचे ग्राहक संरक्षण व अन्न नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद शिंदे, आमदार एम. आर. पाटील, पत्तन पंचायत अध्यक्ष श्यामसुंदर देसाई, कन्नड आणि सांस्कृतिक विभागाचे सहाय्यक संचालक एम. एस. बेक्केरी यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच सवाई गंधर्व स्मारक विश्वस्त संस्थेचे चेअरमन पद्मश्री डॉ. अरविंद काटगी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे. या महोत्सवात पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे यांना ‘सवाई गंधर्व राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर रोजी पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, विदुषी पद्मिनी राव, पं. उमेश चौधरी, पं. क्रिशनेंद्र वाडीकर, पं. रतन शर्मा, पं. अभिषेक जोशी, श्रीकांत देवी व राजेश्वरी पाटील यांचे शास्त्रीय गायन सादर होणार आहे. तसेच विद्वान द्वारकिश एम. व पं. आनंद पाटील यांची कर्नाटकी वीणा-गायन जुगलबंदी आणि हेमंत जोशी यांचे तबलावादन होणार आहे. १६ सप्टेंबर रोजी पद्मश्री एम. वेंकटेश कुमार, पं. गणपती भट, अशोक नाडगीर, वीणा हंगल यांच्यासह अनेक मान्यवर गायक आपले सादरीकरण करणार आहेत. रायगड-नवी मुंबईचे सुपुत्र, रायगड भूषण पं. उमेश चौधरी यांना प्रतिष्ठित सवाई गंधर्व संगीत महोत्सवात शास्त्रीय गायनाची संधी मिळणे हा खरोखरच मोठा सन्मान आहे. पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, पद्मश्री एम. वेंकटेश कुमार, पं. गणपती भट यांसारख्या जागतिक कीर्तीच्या दिग्गज कलाकारांच्या बरोबरीने एकाच मंचावर सादरीकरण करण्याची ही संधी केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर रायगड-नवी मुंबईसाठीही मानाचा क्षण आहे.

Post a Comment

0 Comments