शेतकऱ्यांची कर्जमाफी व व्यापाऱ्यांना मदतीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

प्रतिनिधी/मुंबई : अतिवृष्टी व ओल्या दुष्काळामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज मुंबई येथील राष्ट्रवादी भवनामध्ये सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केले.
या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणे, जमिनीची माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख मदत, पिकांचे नुकसान झालेल्यांना एकरी ५० हजार भरपाई, घरांच्या नुकसानीसाठी ७० टक्के भरपाई तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानांच्या नुकसानीसाठी ७० टक्के मदत या ठोस मागण्या सरकारसमोर करण्यात आल्या.शेतकरी व व्यापारी वर्गाला न्याय मिळालाच पाहिजे, त्यांच्या हक्काची मदत तातडीने मिळाली पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया आंदोलनातून देण्यात आली. राज्य सरकारने या मागण्या तात्काळ मान्य करून दिलासा द्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशाराही देण्यात आला.या आंदोलनात पक्षाचे प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments