चौक/ (वार्ता)दि. २२ सप्टेंबर : “स्वच्छ आणि शुद्ध पाणी हे आरोग्याचे मूलभूत आधारस्थान आहे. गावकऱ्यांना ते सहज व परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी असून, ती पार पाडताना समाधान वाटते,असे प्रतिपादन ग्रुप ग्रामपंचायत चौकच्या सरपंच रितू ठोंबरे यांनी केले.नांदी फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने चौक बाजारपेठेत १७० वर्ष जुन्या दगडी शाळेच्या आवारात आरओ शुद्ध पाणीपुरवठा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पाचा शुभारंभ सरपंच रितू ठोंबरे यांच्या हस्ते झाला. या वेळी नांदी फाऊंडेशन चे आंतरराष्ट्रीय सीईओ गॅलरी, महाराष्ट्र सीईओ दिव्या, भाजप उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, चौक प्रभारी विशाल पवार व पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे हे मान्यवर उपस्थित होते. गावकऱ्यांच्या सततच्या गरजांचा विचार करून सरपंच रितू ठोंबरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण करता आला, असे प्रतिपादन नांदी फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय सीईओ गॅलरी यांनी केले. चौक ही तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असून येथे शाळा, महाविद्यालये तसेच अनेक शासकीय कार्यालये असल्याने दररोज हजारो लोकांची वर्दळ असते. त्यामुळे या शुद्ध पाणी केंद्राचा लाभ केवळ स्थानिक नागरिकांनाच नव्हे, तर बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांनाही होणार आहे.ग्रामपंचायत अधिकारी गणेश मोरे यांनी सांगितले की, नागरिकांना फक्त ८ रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी २४ तास उपलब्ध होणार असून गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे.
0 Comments