पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "आमदार प्रशांत ठाकूर चषक : वक्तृत्व स्पर्धा २०२५" अंतर्गत शाळाअंतर्गत फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा सी. के. ठाकूर विद्यालय, नवीन पनवेल (मराठी माध्यम) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका राजेश्री वावेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, मुख्याध्यापक सुभाष मानकर. पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, अक्षय सिंग, मयूर कदम, श्रावण घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्न, पर्यावरण संवर्धन, स्वच्छ भारत, प्लास्टिकमुक्त भारत, शिक्षणाचे महत्त्व, वेळेचे व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या विविध विषयांवर प्रभावी विचार मांडले. वक्तृत्वातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि नेतृत्वगुण स्पष्ट दिसून आले.या फेरीत एकूण ३० विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांची निवड पुढील आंतरशालेय फेरीसाठी करण्यात आली आहे. कार्यक्रमादरम्यान विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांनी विद्यार्थ्यांना विचार व्यक्त करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे,” असे त्यांनी मत व्यक्त केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील सक्षम वक्ते, नेते आणि आत्मविश्वासी नागरिक बनण्याची प्रेरणा मिळाली.
0 Comments