पनवेल तालुक्यात प्रथमच श्रीमद भगवद गीता पठण स्पर्धा

पनवेल (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने "श्रीमद भगवद गीता पठण" स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती (दि. १७) येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष म्हणजे प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले असून अभिनव उपक्रम असलेल्या या स्पर्धेत हजारोंच्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी यावेळी केले. पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, गुरुकुलम न्यास अध्यक्ष मंजिरी फडके, संस्कार भारतीच्या जुईली चव्हाण, संस्कृत भारतीच्या अनया करंदीकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, श्यामनाथ पुंडे, अमोल खेर, चिन्मय समेळ, गणेश जगताप आदी उपस्थित होते. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्रीगुरुकुलम् न्यासतर्फे आज सकाळी श्री. विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे "श्रीमद् भगवद् गीता पाठ महायज्ञ" संपन्न झाले. तसेच एकाच वेळी २०० हुन अधिक जणांनी एकत्र येऊन श्रीमत भगवद गीतेतील सर्व श्लोकांचे लयबद्ध पठण करून गीतेच्या ज्ञानाचा दिव्य अनुभव घेतला. या संस्कारमय कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्रीमद भगवद गीता पठण स्पर्धेची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी या स्पर्धेविषयी माहिती देताना पुढे सांगण्यात आले कि, ही स्पर्धा पनवेल तालुक्यात मर्यादित असून प्रवेश विनामूल्य असेल. शालेय गट आणि खुला गट अशा दोन गटात स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धक हा पनवेल तालुक्याचा रहिवासी अथवा तालुक्यातील शाळेचा विद्यार्थी असणे आवश्यक आहे. स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा टप्प्यांत घेण्यात येणार असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२५ आहे. अर्ज गुगल फॉर्म किंवा क्यू आर कोडद्वारे सादर करावा. प्राथमिक फेरी पनवेल शहर, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, नेरे आणि उलवे येथे होणार असून सहभागी स्पर्धकांना त्यांच्यासाठीचे स्पर्धा केंद्र १५ ऑक्टोबरनंतर जाहीर केले जातील. त्यानंतर अंतिम फेरी १३ व १४ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. शालेय गट इयत्ता ३ री व ४थी साठी अध्याय १२ (भक्ती योग) श्लोक १ ते १०, इयत्ता ५वी ते ७ वी करिता अध्याय १२ (भक्ती योग) संपूर्ण, तर इयत्ता ८ वी ते १०वी साठी अध्याय १५ (पुरुषोत्तम योग) संपूर्ण असे विषय आहेत. तर खुला गटासाठी संपूर्ण श्रीमद भगवद गीता मधील कोणताही श्लोक विचारण्यात येईल. खुला गटातील प्रथम क्रमांकास २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १८ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये, तर शालेय गटातील इयत्ता ३ री व ४थी मधील प्रथम क्रमांकास ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये तर तृतीय क्रमांकास २ हजार रुपये, इयत्ता ५वी ते ७वी मधील प्रथम क्रमांक ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ८ हजार तर तृतीय क्रमांकाला ५ हजार रुपये तसेच इयत्ता ८वी ते १०वी मधील प्रथम क्रमांकास १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ११ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला ८ हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरूप आहे. त्याचबरोबर प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल, तसेच विजेत्याला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार स्पर्धकांच्या सोयीसाठी संबंधित अध्यायांचे ऑडिओ व पीडीएफ मागणीनुसार उपलब्ध करून दिले जातील, असेही या पत्रकार परिषदेत माहिती देताना नमूद करण्यात आले.

चौकट - 
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले असून “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या ध्येयवाक्याने भारताच्या प्रगतीला वेग दिला आहे. देशहितासाठी त्यांनी दिलेले नेतृत्व आणि केलेली कार्ये ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.जागतिक स्तरावर भारताची छाप पाडण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, प्रामाणिक परिश्रम, समाजकल्याणाची बांधिलकी आणि राष्ट्रहितासाठीचे समर्पण यामुळे भारत आज नव्या उंचीवर पोहोचला आहे.आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे कार्य महान असून त्यांच्या कार्याची उंची खूप मोठी आहे. सतत देशाच्या विकासाचा ध्यास घेऊन ते देशासाठी अहोरात्र काम करत असतात. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना दीर्घायुष्य लाभो हि सर्वांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो. संस्कृत भाषा ज्ञानाची आणि संस्कृतीची आहे. आपल्या देशातील भाषा आणि साहित्य देशाचे वैभव आहे, त्या अनुषंगाने आपली संस्कृती वृद्धिंगत होत राहणे हि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. संस्कृत भाषेविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी श्रीमद भगवद गीता पठण" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून हा प्रयत्न कायम असणार आहे. - आमदार प्रशांत ठाकूर

Post a Comment

0 Comments