पनवेल (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी दिला जाणाऱ्या 'सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार'ने रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला प्रदान करून केंद्रीय संसदीय कामकाज व अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनातील योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय सहभागाची दखल घेत हा सन्मान दिला. या पुरस्कारामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाने विद्यापीठ क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले असून विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरले आहे.मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे झालेल्या या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे सचिव चंद्रशेखर कुमार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन कार्य, सामाजिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवल्या जाणार्या उपक्रमांची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.‘रयत’चे सचिव विकास देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण चांदोरे, उपप्राचार्य डॉ. संतोष मेंगाळ, माजी प्राचार्य डॉ. लक्ष्मण भोर आदींनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी हजर होते.महाविद्यालयातील अध्यापनाची गुणवत्ता, संशोधनातील उत्कृष्टता, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहभाग तसेच सामाजिक जबाबदारीची जाण यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने पुरस्कार देण्यामागे नमूद केले. अशा प्रकारे लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाने विद्यापीठ क्षेत्रात आपले नाव अग्रस्थानी ठेवले. याबद्दल संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल ज्येष्ठ सदस्य तथा थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सचिव विकास देशमुख, सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले.मोखाडा परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य करत असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालय या सन्मानामुळे संपूर्ण विद्यापीठ परिसरातच नव्हे तर समाजजीवनातही प्रेरणादायी ठरले आहे.
0 Comments