उत्तर व दक्षिण रायगड जिल्ह्यातून एक लाखाहून अधिक बहिणींनी पाठवल्या देवाभाऊंना राख्या

पनवेल (प्रतिनिधी) महिलांच्या सशक्तीकरणासाठी राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने काम करत आहे. त्या अनुषंगाने महिलांसाठी अधिकाधिक कौशल्यविकास योजना राबविल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज (दि. १८) येथे दिली.रक्षाबंधनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर व दक्षिण रायगड जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक बहिणींनी राख्या आणि त्यासोबत शुभसंदेश पाठविले आहेत. पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या सोहळ्यात या राख्या नामदार मंगलप्रभात लोढा यांनी स्विकारल्या. आणि या राख्या व संदेश नामदार मंगलप्रभात लोढा यांच्या मार्फत देवाभाऊंकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करताना मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. नामदार मंगलप्रभात लोढा यांनी बोलताना, रायगड जिल्हा सक्रिय जिल्हा असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले कि, देवाभाऊ आणि लाडक्या बहिणीचे नाते अतूट आहे. त्यामुळे हा कार्यक्रम भावनिक असा आहे. महिलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी सरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात. त्यानुसार महिला बचत गट आर्थिक दृष्टया बळकट झाले पाहिजेत यासाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकास विशेष कोर्स आयोजित केले जाणार आहेत. महिलांसाठी जास्त जास्त कार्यक्रम राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच त्यांनी यावेळी लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्मरण करून विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले कि, देवाभाऊंनी गावागावात घरोघरी पक्ष पोहोचविण्यासाठी कष्ट उपसले आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक भागात भाजपची ताकद वाढली आहे. मोदी सरकार व राज्य सरकारच्या योजना तळागाळात पोहोचविण्याचे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केंद्रात काम करत आहेत त्याचप्रमाणे देवेंद्रजी राज्यात लोकाभिमुख काम करत आहेत आणि त्यानुसार राज्याचा विकास होत असून देवाभाऊंच्या विषयी सर्वाना आदर आहे. महिलांच्या उत्कर्षासाठी त्यांनी विविध योजना अंमलात आणल्या. त्यामुळे लाडके देवाभाऊ आपल्या बंधूप्रमाणे असल्याची भावना त्यांच्या मनात आहे त्यामुळेच बहिणींनी आस्थेने देवाभाऊंना रक्षाबंधन निमित्त राख्या पाठवल्या आहेत, आणि त्या अनुषंगाने तेवढयाच आत्मीयतेने हा कार्यक्रम होत आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निरोगी शतायुष्य लाभो, अशा शब्दात शुभचिंतन केले. प्रास्तविकपर भाषणात बोलताना उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी रक्षाबंधन उपक्रमाची माहिती दिली. बुथनिहाय संपर्क झाल्यावर बहिणींनी स्वईच्छेने राख्या पाठवल्या त्याचबरोबर देवाभाऊंना शुभेच्छा देणारे संदेशही त्यांनी दिले, असल्याचे सांगितले. यावेळी दक्षिण रायगड महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास उत्तर रायगड भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, जिल्हा उपाध्यक्ष आश्विनी पाटील, प्रल्हाद केणी, मयुरेश नेतकर, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, खालापूर पूर्व मंडल अध्यक्ष सनी यादव, खोपोली मंडल अध्यक्ष राहुल जाधव यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, महिला मोर्चाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments