पनवेल(प्रतिनिधी) दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी पनवेलची सांस्कृतिक भूमी भारतीय शास्त्रीय नृत्याच्या रंगांनी उजळून निघणार आहे आणि त्याचे कारण आहे, नृत्यार्पणा फाईन आर्ट्स सेंटरच्या वतीने आपल्या समृद्ध नृत्य वारशाच्या जतन व प्रसारासाठी समर्पित एक महोत्सव आणि त्याचे नाव आहे "मयूखा". विशेष म्हणजे परंपरा आणि कलात्मकतेचा संगम असलेला हा एवढा मोठा कार्यक्रम रसिकांसाठी विनाशुल्क असणार आहे. पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालय या ठिकाणी होणारा हा कार्यक्रम २३ ऑगस्टला सायंकाळी ०६ वाजता सुरू होणार आहे. यामध्ये नालंदा बानीतील मोहिनीयट्टम ख्यातनाम वादकांचा थेट वाद्यमेळ पनवेल व परिसरातील कला-रसिकांसाठी एक सांस्कृतिक मेजवानी असणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व मयूखा प्रायोजक परेश ठाकूर, नॅशनल टेलिफोन अॅडव्हायजरी कमिटी सदस्य श्री. रमेश, विशेष पाहुणे म्हणून नालंदा नृत्यकला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उमा रेले, मोहिनीअट्टम नृत्यांगना व संस्थापिका निदेशिका डॉ. डिंपल नायर तर सेलिब्रिटी पाहुणे म्हणून मल्याळम अभिनेत्री व शास्त्रीय नृत्यांगना देवी चंदना, मराठी अभिनेत्री व शास्त्रीय नृत्यांगना तन्वी पळव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पद्मभूषण डॉ. कनक रेले यांच्या शिष्या व नालंदा नृत्यकला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी नयना प्रकाश यांच्या संकल्पना व दिग्दर्शनाखाली हा उत्सव आयोजित होत आहे. मयूखाचा उद्देश कलाकार, रसिक आणि सांस्कृतिक प्रेमींना एका व्यासपीठावर आणणे हा आहे. या वर्षीच्या उद्घाटन कार्यक्रमात नालंदा बानीतील मोहिनीयट्टमचे मनमोहक सोलो सादरीकरण होणार असून, ते कलाश्री कलामंदलम सी. गोपाळकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यकलामंदिरम् सेंटर फॉर आर्ट्समार्फत सादर केले जाणार आहे. सादरीकरणासोबत थेट वाद्यमेळाचा संगत असेल, ज्यामुळे प्रेक्षकांना एक अद्वितीय सांस्कृतिक अनुभव मिळेल. "मयूखा" हे असे व्यासपीठ आहे जे केवळ शास्त्रीय नृत्यप्रकारांची गहनता आणि सौंदर्य प्रदर्शित करत नाही, तर पुढील पिढीतील कलाकारांना प्रोत्साहन देते. नृत्यार्पणा फाईन आर्ट्स सेंटर या उपक्रमाद्वारे तरुण नर्तकांना प्रेरणा देण्याचे आणि प्रेक्षकांना भारताच्या पारंपरिक कलांचा खरा आस्वाद देण्याचे उद्दिष्ट ठेवते. परफॉर्मिंग आर्ट्समधील पदव्युत्तर शिक्षण आणि मोहिनीयट्टमसाठीच्या अनेक वर्षांच्या समर्पणामुळे, नयना प्रकाश यांनी अनेक प्रतिष्ठित मंचांवर सादरीकरणे केली आहेत. त्यांच्या सादरीकरणात लास्य (कोमलता) आणि रौद्रम (तेज) यांचा सुंदर समन्वय दिसून येतो, ज्यामुळे प्रत्येक नृत्यप्रयोग दृश्य व भावनिक दृष्ट्या अद्वितीय ठरतो. परंपरा आणि कलात्मकतेचा संगम असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी एक पर्वणी आहे. त्यामुळे याचा लाभ जास्तीत जास्त रसिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी नयना प्रकाश ७७०००५२४२९ यांना संपर्क साधता येईल.
0 Comments