करंजाडे मध्ये मनसेतर्फे भव्य दहीहंडी उत्सव २०२५ उत्साहात संपन्न

प्रतिनिधी /प्रेरणा गावंड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२५ करंजाडे सेक्टर ३ येथे अत्यंत जल्लोषात व उत्साहात पार पडला."आपला महाराष्ट्र – मराठी माणसाचा अभिमान" या घोषवाक्याखाली आयोजित या उत्सवात रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यातील विविध गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मराठी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरे करण्याचा संकल्प यानिमित्ताने प्रत्यक्षात उतरला. स्पर्धेत सहभागी झालेल्या गोविंदा पथकांनी आपली कौशल्ये दाखवत दहीहंडी फोडली. या भव्य उत्सवात विजेत्या पथकाला “मनसे भव्य चषक” तसेच आकर्षक ₹५,०९,९९९/- चे बक्षीस प्रदान करण्यात आले. यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील व मनसे उपतालुका अध्यक्ष चिंतामणी मुंगाजी यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या भव्य सोहळ्यात उपस्थित नागरिक व गोविंदा पथकांनी महाराष्ट्राची परंपरा, मराठी माणसाचा आत्मसन्मान आणि हिंदू संस्कृतीची झलक अनुभवली.

Post a Comment

0 Comments