प्रतिनीधी : पनवेल : आम्ही आमची सुपीक जमीन सोडली, घरदार त्यागलं, डोळ्यात पाणी आणून देशाच्या प्रगतीसाठी विमानतळाला जागा दिली पण आजही आमचं एकच मागणं अपूर्ण आहे. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव द्या.अशी भावनिक मागणी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी विजय शांताई नामदेव शिरढोणकर यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पावन आहे. आम्ही दोन वेळा प्रकल्पग्रस्त झालो, आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता किमान आमच्या बलिदानाला न्याय मिळावा.
विमानतळाचं काम घाईघाईने पूर्ण करू नका, गुणवत्तेचा त्याग होऊ देऊ नका. अजून इन्फ्रास्ट्रक्चर नाही, फाईव्ह स्टार हॉटेल्स नाहीत, पूल तयार नाही, रस्त्यांची दुरावस्था झाली मेट्रो नाही, कोस्टल रोड पूर्ण झाला नाही, मग कसं सुरू करणार इंटरनॅशनल विमानतळ? यानंतर शिरढोणकर यांनी सुचवले की विमानतळाचं नाव १७ सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस किंवा २५ डिसेंबर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचा जन्मदिवस रोजी जाहीर करा. परंतु प्रत्यक्ष उद्घाटन १३ जानेवारी २०२६ रोजी व्हावे, कारण त्या दिवशी दि. बा. पाटील यांची जन्मशताब्दी आहे. गोव्याला मनोहर पर्रीकर यांचं नाव तुम्ही विमानतळाला दिलंत. मग आमच्या लोकनेत्याला का नाही? आम्ही त्याग केला, घरं दिली, जमीन दिली तरी आजही आम्हाला नावाची प्रतीक्षा करावी लागते. आमच्या सहनशीलतेला आता अंत आला आहे. १३ जानेवारी २०२६ ला जर विमानतळ दि. बा. पाटील यांच्या नावाने सुरू झालं, तर तो आमच्या त्यागाचा खरा सन्मान असेल. असे विजय शिरढोणकर यांनी आवाहन केले.या भावनिक आवाहनासोबतच शिरढोणकर यांनी जाहीरपणे भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा त्याग केला.
0 Comments