सर्व खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू राहील - परेश ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे अकॅडमीला शक्य ती सर्व मदत केली जाईल. तसेच पनवेल महानगरपालिकेने अनेक खेळांची मैदाने उभारली असून, सर्व खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू राहील असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रतिक क्रिकेट अकॅडमीच्या स्नेहमेळाव्यात केले. शहरातील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात प्रतिक क्रिकेट अकॅडमीचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अकॅडमीतील गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या अध्यक्ष्यतेखाली आणि रणजीपटू ऋषभ पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी अकॅडमीचे प्रशिक्षक प्रतिक मोहिते, अध्यक्ष अंकल बहिरा, डॉक्टर संतोष जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. संतोष जाधव यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी अकॅडमीला स्वतःचे मैदान नसल्याने विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणात येत असलेल्या अडचणींवर लक्ष वेधले. त्यानंतर निलेश पाटील यांनी अकॅडमीच्या कार्याविषयी माहिती दिली. स्नेहमेळाव्यात मुंबई संघात निवड झालेली तनिषा शर्मा, जिओ कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी स्वरा, तसेच रायगड जिल्हा संघात निवड झालेले क्रिश, आराध्य, श्रेय, अर्णव, पार्थ, वेदांत आणि ईशान यांसारख्या गुणवंत खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. या स्नेहमेळाव्याला अकॅडमीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments