शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांच्या समस्यांबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या ‘लोहगड’ ह्या शासकीय निवास्थानी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत संबंधित अधिकारी आणि सचिवांच्या उपस्थितीत, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी मुख्याध्यापकांच्या विविध महत्त्वाच्या मागण्या मंत्रीमहोदयांसमोर मांडल्या. ह्यात प्रामुख्याने शासकीय आश्रम शाळेत कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापकांना राजपत्रित दर्जा मिळण्याबाबतच्या मागणीवर सर्वप्रथम चर्चा करण्यात आली. १९९८ च्या अधिसूचने प्रमाणे शासकीय आश्रम शाळेत कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापकांना राजपत्रित अधिकारी म्हणून घोषित केलेले आहे परंतु आदिवासी विकास विभागामध्ये अजूनपर्यंत याबाबत अंमलबजावनी करण्यात आली नसल्याने मुख्याध्यापकांना प्रत्येक निर्णय घेतांना प्रकल्प कार्यालयाच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागते. ह्यामुळे मुख्याध्यापकांची होणारी मानहानी आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सदर विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करून ह्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
मुख्याध्यापकांना वरिष्ठ सहाय्यक प्रकल्प अधिकारी किंवा प्रकल्प अधिकारी ह्या पदांवर पदोन्नती मिळणेबाबत विचार करण्यात यावा अशी मागणी केली.तसेच शाळांबरोबरच मुख्याध्यापकांना देखील साप्ताहिक सुट्टी मिळणे बाबत, मुख्याध्यापकांनी शाळेकरिता खर्च करून प्रतिस्वाक्षरीकरिता सादर केलेल्या देयकावर विहित मुदतीत प्रतिस्वाक्षरी करून मिळणेबाबत आणि पदोन्नतीने मुख्यध्यपकांची रिक्त पदे व इतर पदे तातडीने भरण्याबाबत विविध मागण्यांवर ह्या बैठकीत चर्चा करण्यात आली. आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी मांडलेल्या वरील सर्व मागण्यांबाबत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचे हे प्रलंबित प्रश्न लवकरच निकालात लागतील असा विश्वास आहे. यावेळी पालघर जिल्हा संस्था चालक संघाचे अध्यक्ष वाघेश कदम,जी. वि. शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष प्रणव कदम पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष गणेश प्रधान, कार्याध्यक्ष रवींद्र ठाकूर, उपाध्यक्ष रुपेश वझे, कार्यवाह नामदेव पाटील, जिल्हा समन्वयक श्री घनश्याम नेमाडे, के डी पाटील ,संचालक राजेंद्र ढगे आदि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments