प्रतिनिधी (साबीर शेख):-ता. खालापूर येथील मौजे धामणी (ग्रुप ग्रामपंचायत कुंभिवली) परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांचा रोजगारासाठीचा संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी स्थानिकांना रोजगार मिळावा या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपली जमीन कवडीमोल भावात कंपनीला विकली होती. मात्र, आजतागायत त्या ठिकाणी कोणताही ठोस प्रकल्प उभारला गेला नसल्याने भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.सदर जागा पुढे आशापुरा फुड्स प्रा. लि. या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. मात्र, स्थानिकांना रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण न करता बाहेरील ठेकेदारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त युवक-युवती रोजगारापासून वंचित राहिले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.याशिवाय, स्थानिकांवर दबाव आणण्यासाठी काही राजकीय मंडळींना हाताशी धरून प्रकल्पग्रस्त कुटुंबांवर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या संदर्भात पिंगळे व साबळे कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच तहसीलदार कार्यालयात निवेदने दिली आहेत. अनेक बैठका होऊनही वर्ष उलटून गेले, तरी कोणतीही ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रकल्पग्रस्तांना रोजगार न देणे, नियमबाह्य पद्धतीने कंपनी चालवणे आणि आम्हालाच गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न हा अन्यायकारक आहे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देणार असून गरज पडल्यास उपोषण करू, असा इशारा तानाजी पिंगळे व साबळे बंधूंनी दिला.ही लढाई केवळ रोजगारासाठी नसून हक्क आणि न्यायासाठी असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले असून, आता या प्रकरणात कंपनी आणि प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.याबाबतीत अधिक माहिती साठी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता तो झाला नाही.पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न व्हावा यासाठी सूचना केलेली पहायला मिळाली.
0 Comments